Ad will apear here
Next
‘कंपनी कर कमी केल्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


मुंबई:
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार असून, रोजगारनिर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असून त्याबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ सप्टेंबर रोजी मुंबईत सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रवक्ते अतुल शाह आणि गणेश हाके उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होते. महाराष्ट्र हे देशातील उत्पादन क्षेत्राचे केंद्र आहे. त्यामुळे कर कमी करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक लाभ राज्याला होणार आहे. राज्यात गुंतवणूक वाढेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.’



त्यांनी सांगितले, ‘जागतिक पातळीवरील आर्थिक गती कमी झाल्याचा दुष्परिणाम भारतावर होऊ नये यासाठी, तसेच अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारताला लाभ व्हावा यासाठी निर्मला सीतारामन यांनी धाडसी निर्णय घेतला. यापूर्वी कंपनी कर अधिक असल्याने भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणे अवघड जात होते. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज असून, त्यासाठी कंपनी कर कमी करण्याची मागणी होत होती. अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धामुळे चीनमध्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्या देशात उत्पादन करून निर्यात करणे अवघड होत आहे व परिणामी त्या कंपन्या भारतात येऊ शकतात. गेल्या दोन वर्षांत अशा काही कंपन्या भारतात आल्या आहेत.’

‘नव्या गुंतवणुकीसाठी १५ टक्के कंपनी कर लागू करण्याचा निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे. ज्यांना २०२३पर्यंत उत्पादन सुरू करायचे आहे, अशा कंपन्यांना त्यासाठी लगेच गुंतवणूक करावी लागेल व त्यांना १५ टक्के कराच्या निर्णयाचा लाभ होईल. परिणामी या निर्णयाचा गुंतवणूक होणे व नवे उद्योग उभारणी यासाठी तातडीने उपयोग होईल,’ असेही फडणवीस म्हणाले.
‘बँकांचे विलिनीकरण करून आर्थिक मजबुती, सार्वजनिक बँकांना ७० हजार कोटी रुपये देऊन त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढविणे, लघू उद्योगांचे कर्जाचे हप्ते थकले तरी मार्च २०२०पर्यंत त्यांना थकित कर्ज न ठरविणे, रेपो रेट कमी झाल्यानंतर कर्जाचा व्याजदर आपोआप कमी होण्यासाठी तो दर रेपो रेटशी जोडणे, हॉटेलसाठीचा जीएसटी कमी करणे, अशा निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भाजप-शिवसेना युतीची घोषणा लवकरच करण्यात येईल,’ असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील काही जागा वापरण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका पर्यायी जागेचा आग्रह धरला जात आहे. पण ती पर्यायी जागा मेट्रो कारशेडसाठी घ्यायची, तर त्यासाठी पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील. परिणामी मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता धोक्यात येईल आणि मेट्रोचे तिकीट मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल,’ अशी माहिती त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZSLCE
Similar Posts
महायुतीला २२०पेक्षा अधिक जागा मिळतील; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत २२०पेक्षा अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी (३० ऑक्टोबर) मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. ‘राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून, महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
‘बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महाराष्ट्रात यशस्वी’ मुंबई : ‘बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले आहे. या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language